Sampurn Engraji Vyakaran इंग्रजी व्याकरण -बाळासाहेब शिंदे
लेखक : बाळासाहेब शिंदे
गरज वाटल्यास …
मंदिरातल्या कीर्तनाचा आवाज घरापर्यंत स्पष्ट ऐकू येत होता. शेवटी मी मुलाबाळांसह घरी आलो होतो, याचे आई-वडिलांना समाधान वाटत होते. सावत्र आई चुलीवर स्वयंपाक करण्यात मग्न होती, तर आई मात्र तिला मदत न करता महाराजांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवून होती. आठ वर्षापासून अंथरुणाला खिळून असलेले वडील कानात प्राण आणून ‘आता तरी माझे नाव ऐकू येईल’ म्हणून शब्द न शब्द ऐकत होते. मी मात्र रिकामे ताट समोर ठेवून कधी एकदा आई वाढते याची वाट पाहत होतो. मी पुन्हा एकटाच औरंगाबादला निघून जाईन या भीतीने मुले झोपण्यास तयार नव्हती. कीर्तन जवळपास संपत आले होते. गावातील सर्व प्रतिष्ठित देणगीदार व्यक्तींच्या नावांची यादी वाचून झाली; परंतु जो माणूस चाळीस वर्षे समर्थपणे गावगाडा चालवून गोरगरिबांच्या अडचणीत त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला होता, त्याच्या नावाचा साधा उल्लेखही कुठे नव्हता. जाताना तरी महाराज आपली चौकशी करतील या अपेक्षेने वडिलांची क्षीण झालेली नजर दरवाजाकडे खिळून होती, गाडी गेल्याचा आवाज ऐकू आला आणि वडिलांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. बसल्या जागेवरच त्यांनी अंग टाकलं आणि आईला पांघरूण घालण्यासाठी इशारा केला.
मी ताटावरून उठलो, पांघरूण घालताना त्या खोल गेलेल्या डोळ्यांत आसवांची झालेली दाटी पाहून मनाला असंख्य वेदना झाल्या. आईने मात्र कोपऱ्यात जाऊन डोळ्याला पदर लावला. मी जवळ जाऊन तिच्या खांदयावर हात ठेवला. तिने फक्त निर्विकार डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले अन् पुन्हा कामाला लागली. मी मात्र तिचे सांत्वनही करू शकत नव्हतो. मी फक्त तिचा वंशाचा दिवा होतो. मुलगा म्हणून अभिमान वाटावा अशी कोणतीच गोष्ट माझ्यात नव्हती, म्हणून माझ्याकडून एखादी अपेक्षा करणंही तिनं आता सोडून दिलं होतं, “आमचं काय? झालं गेलं, आता तू तुझ्या मुलाबाळांसह सुखी रहा. “एवढंच तिचं वाक्य असायचं. पोटात आग पडली असतानाही घास खाली उतरत नव्हता. आपण जन्माला आलो नसतो तर बरं झाल असतं, निदान मुलगा असून नसल्याचं दुःख तरी त्यांना झालं नसतं, माझ्या हट्टी आणि घमेंडखोर स्वभावामुळे स्वतःच्या आयुष्यातील उमेदीच्या काळातील १२ वर्षांची बरबादी तर केलीच होती; याशिवाय वडिलोपार्जित सहा एकर बागायती जमीन गमवावी लागली होती. भूतकाळातील चुका भुतासारख्या फेर धरून समोर नाचत होत्या. वयाच्या ३६व्या वर्षापर्यंत म्हाताऱ्या आई-वडिलांच्या जिवावर बसून खाणारा ऐतखाऊ, एवढीच माझी ओळख होती. काहीच नसताना सर्व काही आहे, हा दिखाऊपणा पुरता उघडा पडला होता. समोरून येणारी माणसेही मला पाहिल्यावर आपला रस्ता बदलत होती. आज मात्र पूर्ण हरल्याची जाणीव झाली होती. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. दुसऱ्या दिवशी माझा राहिलेला पसारा आणण्यासाठी मला औरंगाबादला जायचं होतं. भल्या पहाटे आई एकटीच उठली होती. ‘एवढे दिवस सहन केलंस’ आता फक्त सहा महिने दे…. असे मी म्हणालो. तिने फक्त मान हलविली.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.