Gas Chamber by Ratankar Matkari | गॅस चेंबर
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
Gas Chamber by Ratankar Matkari | गॅस चेंबर
Author : Ratankar Matkari
ISBN No : 9788195238170
Language : Marathi
Publisher : Samakalin Prakashan समकालीन प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Gas Chamber by Ratankar Matkari | गॅस चेंबर
गॅस चेंबर
– रत्नाकर मतकरी
रत्नाकर मतकरी हे नाव गूढकथांसाठी घेतलं जातं. तसं ते रास्तच आहे. कारण त्यांनी गूढकथा लिहिल्या. दोन-पाच नाही, तर खूप मोठ्या प्रमाणात. जणू त्यांच्या कथापासूनच हा साहित्यप्रकार सुरू झाला असं म्हटलं तरीही चालेल. या साहित्यप्रकाराची व्यवच्छेदक लक्षणं काय, त्याची वैशिष्ट्यं काय, या कथा कशा ओळखाव्या हे लोकांच्या मनात पुरतं ठसेल एवढं लिखाण त्यांनी केलं. त्यामुळे आज रत्नाकर मतकरी म्हणजे गूढकथा, असं एक समीकरणच होऊन बसलेलं आहे. ‘गॅस चेंबर’ या संग्रहातल्या कथा मात्र गूढकथा नव्हेत. कदाचित आपण त्यांना भयकथा म्हणू शकतो..
मतकरींचं लेखन हे कधीच एका विधेला, एका साहित्यप्रकाराला, एका विषयाला बांधून राहिलं नाही. ते वयाच्या सोळाव्या वर्षांपासून सुरू झालं आणि चौफेर पसरत गेलं. एकांकिका, बालनाट्य, प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं, गूढकथा, वास्तववादी कथा, ललित लेख असं बरंच काही त्यांनी लिहिलं; पण त्यांच्या लेखनात, (तसं एरवीच्या आयुष्यातदेखील) सामाजिक विचाराला मोठं स्थान राहिलं. उदाहरणादाखल त्यांच्या गूढकथा लेखनाकडे पाहिलं तर लक्षात येईल, की ‘खेकडा’, ‘कबंध’, ‘फाशी बखळ’ अशा त्यांच्या आधीच्या संग्रहांपेक्षा ‘निर्मनुष्य’, ‘अंतर्बाह्य’ अशा पुढल्या काळातल्या संग्रहांमधल्या कथा त्यांमधली गूढता टिकवूनही वास्तवाचा विचार अधिक खोलात जाऊन करतात. ‘इन्वेस्टमेन्ट’ संग्रहातल्या कथा तर त्याहूनही पुढे जात सामाजिक मुद्द्यांची मांडणी करणाऱ्याच आहेत. ‘इन्वेस्टमेन्ट’ ही शीर्षक कथा ही त्यांच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट कथांमधली एक आहे, जी आपल्या भोवतालचं वास्तव कशा पद्धतीने बदलत जातंय याचं जाणीवपूर्वक निरीक्षण करते. ती जेव्हा २००३ मध्ये प्रकाशित झाली, तेव्हा अनेकांना त्यातला आशय काहीसा टोकाचा, अतिरंजित वाटला. आज मात्र वास्तव त्या कथेपर्यंत येऊन पोचलेलं आहे.
ही वास्तवाची जाण त्यांच्या इतर लेखनातही आहे. मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’, ‘निम्माशिम्मा राक्षस सारखी धमाल बालनाट्यं लिहिणाऱ्या, ‘चार दिवस प्रेमाचे’ आणि ‘जादू तेरी नजर’ सारख्या प्लेझन्ट सुखांतिका लिहिणाऱ्या मतकरींनी ‘लोककथा ७८’, ‘गणेश गिरणीचा पैकाला’, ‘मेजवानीचा फार्स’ अशी तत्कालीन वास्तवाची भेदक मांडणी करणारी नाटकंही लिहिली. आपल्या ‘सोनेरी सावल्या’ सारख्या सदरातून अप्रत्यक्षपणे, तर ‘कायमचे प्रश्न’ या लेखसंग्रहात दिसणाऱ्या लेखांमधून थेटपणेही त्यांनी समाजकारण आणि राजकारण यांवर भाष्य केलेलं आहे. समाजात वेळोवेळी दिसणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तीला उघडपणे विरोध करणं, जनआंदोलनांमध्ये रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष सहभाग दर्शवणं, प्रसंगी व्यासपीठावरूनही त्यावर बोलणं हादेखील त्यांच्या सामाजिक जाणिवेचाच एक भाग आहे. ‘गॅस चेंबर मधल्या कथा हे या भूमिकेशी सुसंगत असं पुढचं पाऊल मानता येईल. २०१५ साली त्यांनी ‘अनुभव’ आणि ‘सकाळ’ या दिवाळी अंकांत अनुक्रमे ‘अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत’ आणि ‘सुरक्षित’ या कथा लिहिल्या, आणि पुढल्या काळात ते सातत्याने या वळणाच्या कथा लिहीत गेले. या सातही कथा या संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
पाश्चात्य टर्मिनलॉजी वापरायची तर या कथांना डिस्टोपिअन म्हणता येईल. पण मराठीत या कथांचं वर्णन करताना ज्येष्ठ समीक्षक सुधा जोशी यांनी योजलेला ‘अनर्थकथा’ हा सोपा पण चपखल शब्द वापरण्यावाचून पर्याय नाही. या कथा म्हटलं तर राजकीय आहेत म्हटलं तर सामाजिक. एखादी विचारधारा वरवर सामाजिक सलोख्याची प्रगतिशील विकासाची साद घालताना खोलवर परिणाम करणारा नकारात्मक बदल कशी घडवू शकते याचं त्या निरीक्षण करतात. पण कथांमधला भीतिदायक भाग हा प्रत्यक्ष बदलाच्या स्वरूपाशी जोडलेला नाही, तर त्या बदलाला मिळणाऱ्या समाजमान्यतेचं दर्शन हे लेखकाच्या भूमिकेतल्या मतकरींना आणि वाचक म्हणून आपल्यालाही त्या वाचताना वाटणाऱ्या अस्वस्थतेचं कारण मानता येईल.
“गॅस चेंबर’ला आपण कथामालिका मानू शकतो, कारण एकाच कथानकाचा धागा जरी या सर्व कथांमधून गुंफलेला नसला, तरी या साऱ्या कथा एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे स्पष्टच आहे. त्यांच्या निवेदनशैलीत मात्र वैविध्य आहे. गॅस चेंबर’ कक्षेमधल्या साध्या वास्तववादी पद्धतीच्या मांडणीपासून सुरू होत त्या पुढे प्रतीकात्मक आशयाकडे वळतात अणि अखेर ‘डोरोथीची गोष्ट’ मध्ये रूपककथेच्या टप्प्याशी येऊन थांबतात. हा चढता क्रम या कथांमधल्या आशयाशीही जोडता येतो. समाजाच्या विविध स्तरांवर नजर टाकता टाकता त्यांमध्ये झिरपत जाणाऱ्या गडदपणाचं प्रमाणही वाढत जातं.
‘गॅसचेंबर’मधील कथांचा काळ हा म्हटलं तर ‘नजीकचा भविष्यकाळ’ या दोन शब्दांत मांडता येईल, आणि त्या दृष्टीने पाहता त्यांना समकालीन प्रादेशिक संदर्भ नक्कीच आहेत. तरीही या कथांचं स्वरूप केवळ एकाच काळाशी जोडावं असं मला वाटत नाही. कदाचित एका प्रांताशीही नाही. या कथा विशिष्ट धारणेची एकाधिकारशाही आणि तिच्या पकडीखाली असलेल्या समाजावर तिचा होणारा अपरिहार्य परिणाम या संकल्पनेभोवती फिरणाऱ्या आहेत. तपशील बदलले, प्रांत- काळ यांची वेगळी गणितं लावून पाहिली तरी या कथांमागचा विचार त्यामुळे बदलणार नाही. १९४९ साली जॉर्ज ऑरवेलने लिहिलेलं ‘1984’ ज्या अर्थाने जुनं होऊ शकत नाही, त्या अर्थाने या कथाही जुन्या होणार नाहीत. त्या व्यक्तीपेक्षा प्रवृत्तीबद्दलच्या कथा असल्याचं लक्षात घेतलं तर आपल्याला त्यांच्या कथनामागची वैश्विक संगती लागू शकेल.
रत्नाकर मतकरींना केवळ एका साहित्यप्रकाराशी जोडणं किती तोकडं आहे याची कल्पना हा त्यांचा नवा कथासंग्रह वाचताना नक्कीच येईल. मतकरी हे त्यांच्या काळाचे साक्षीदार होते, अभ्यासक होते. आपल्याला पटेल ते बोलताना, लिहिताना त्यांनी ते कोणाला कसं वाटेल याचा कधी विचार केला नाही. त्यांची बांधिलकी त्यांच्या वाचकांशी होती, समाजाशी होती. आपल्या भवतालाचा सततचा विचार करणं आणि आपल्या मनाला जे पटतं त्याची निर्भीड मांडणी करणं हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य या संग्रहातून पुन्हा एकदा जाणवेल. मतकरींच्या एकूण साहित्यात ‘गॅस चेंबर’ या संग्रहाचं महत्त्व असाधारण आहे.
– गणेश मतकरी
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.