Agnipankh Atmacharitra (अग्निपंख)-A.P.J Abdul kalam Marathi Book katha-kadambari (Novel) Madhushree
या पुस्तकात माझ्या आयुष्यातील ज्या घटना, जे प्रसंग मी सांगितले आहेत ते जेव्हा मला आठवले तेव्हा त्यातले कोणते सांगण्याजोगे आहेत याविषयी माझ्या मनात अनिश्चितता होती. मनात असा प्रश्न येत होता की माझ्या दृष्टीने माझे सगळेच लहानपण मला खूप मौल्यवान वाटत असले तरी ते सगळ्यांनाच तसे मोलाचे वाटेल का?
एका लहानशा गावातल्या मुलाला आयुष्यात सामोऱ्या जायला लागलेल्या विविध सोप्या आणि अवघड परीक्षा, कसोट्या आणि त्यात त्याने मिळवलेले यश-अपयश, त्याच्या शाळेच्या काळातले आर्थिक ताणतणाव, शाळेची फी भरण्यासाठी त्याने केलेली घरकामे, मोलमजुरी, कॉलेजात असताना केवळ शाकाहारी अन्न कमी पैशात मिळते म्हणून शाकाहारी होण्याचा त्याने घेतलेला निर्णय, भारतीय लष्कराच्या वायुदलात वैमानिक होण्यासाठी त्याने केलेले अयशस्वी प्रयत्न, आपल्या मुलाने एखाद्या सरकारी खात्यात ‘चिकटावे’ अशी वडिलांची रास्तच इच्छा असताना त्याने रॉकेट इंजिनिअर होणे या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य वाचकांना जाणून घेण्याजोग्या वाटतील का? त्यामुळे त्यांचा काही फायदा होईल का?
बऱ्याच विचारांती माझे मलाच हे पटले की माझी ही ‘कथा’ इतर कशामुळे नाही तरी ती एका व्यक्तीच्या नियतीने योजलेल्या प्रारब्धाची कथा आहे आणि ती ज्या सामाजिक चौकटीत घडली आहे तिच्यापासून वेगळी काढली तर तिला अर्थच उरणार नाही म्हणून ती समर्पकही वाटेल आणि वाचावीशीही वाटेल. मग ती माझी जीवनकथा घडत असताना ज्या व्यक्तींचा तिच्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा आहे अशा व्यक्तींचाही परिचय करून देण्याचे मी ठरवले. माझे जन्मदाते आई-वडील, माझे कुटुंबीय, माझ्या विद्यार्थिदशेतील आणि व्यावसायिक आयुष्यातील माझे आदरणीय गुरुजन, माझे अतिशय विश्वसनीय असे अनुभवी सल्लागार, मार्गदर्शक माझ्या आयुष्यात आले, त्यांनी मला त्यांच्या आयुष्यात जागा दिली याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे हे मी त्या सर्वांना या पुस्तकाद्वारे नम्रपणे सांगू इच्छितो.
त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छितो की ही कथा केवळ माझ्या व्यक्तिगत यशाची, मी केलेल्या कामगिऱ्यांची नाही, तर मला कराव्या लागलेल्या कष्टांची, भोगावी लागलेली दुःखे, क्लेश, यातना यांचीही आहे. तसेच ती आधुनिक भारतात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्थान मिळवण्याचे प्रयत्न करत असलेल्या वैज्ञानिक उद्योगांना मिळू शकलेल्या यशांची, त्यांच्या प्रगतीची आणि त्यातील अडचणींची, त्यांना सोसाव्या लागलेल्या पीछेहाटीचीही आहे. माझ्याबरोबर माझ्यासारखीच स्वप्ने पाहणाऱ्या माझ्य सहकाऱ्यांचे अतुलनीय गुण, कधीच कमी न होणारा त्यांचा उत्साह आणि त्यांनी मला सातत्याने दिलेले दुर्दम्य असे सहकार्य यांचे मी मनापासून कौतुकही करतो आणि त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो. त्या काळात आपला देश वैज्ञानिक क्षेत्रात, तांत्रिक बाबींमध्ये स्वयंपूर्ण होण्याचा, त्यासाठी लागणाऱ्या क्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होता त्याची ही कथा एक ‘वीरगाथा’च आहे ती खरेतर त्या आणि आजच्या काळासाठीही खूप काही शिकता येईल अशी ‘तात्पर्यकथा’ ठरेल. आपल्या सर्वांच्या अंतरंगात एक पवित्र यज्ञ – एक धगधगता अग्नी पेटलेला असतो, त्या अग्नीला पंख देण्याचा – ‘अग्निपंख’ देण्याचा आपण कायम प्रयत्न केला पाहिजे.
देवाचे आशीर्वाद सतत तुम्हाला लाभोत.
ए. पी. जे. अब्दुल कलाम
***
Available at Ksagar Book Centre Granth
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.