Sadhar Aani Sadetod – साधार आणि सडेतोड
₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
Sadhar Aani Sadetod – साधार आणि सडेतोड
Author : Nilu Damle
ISBN No : 9789392624179
Language : Marathi
Publisher : Samakalin Prakashan समकालीन प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Sadhar Aani Sadetod – साधार आणि सडेतोड
– निळू दामले
साधारणपणे १९६८ सालापासून मी भटकतोय, लिहितोय. १९७२ सालापासून वाच वाच वाचतोय. त्या साली मी दैनिक मराठवाडामधे दाखल झालो. तिथे माँद (पॅरिस), वॉशिंग्टन पोस्ट (न्यू यॉर्क) आणि गार्डियन (लंडन) या तीन पेपरांतला निवडक मजकूर एकत्र केलेली १६ किंवा २० पानी पुरवणी येत असे. फिकट निळ्या पातळ कागदावर हा मजकूर छापलेला असे. ब्रिटीश कौन्सिल दैनिकांना तो कॉप्लिमेंटरी म्हणून पाठवत असे. मोजक्या शब्दांत, अचूक माहिती आणि अत्यंत वाचनीय शैली. तो पेपर वाचून साऱ्या जगाचं भान येत असे. या पुरवणीने माझं जगच बदललं. पत्रकारिता म्हणजे काय असते याची ओळख मला वरील तीन पेपरांतल्या मजकुरांनी करून दिली.
मी औरंगाबाद सोडलं, मुंबईत दाखल झालो. एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात जाऊ लागलो. दैनिकात काम करत नसल्याने परदेशी पेपर मिळवायचे तर एशियाटिकमध्ये जावं लागत असे. एशियाटिकमध्ये त्याचा खजिनाच होता. न्यू यॉर्क टाइम्स हे दैनिक आणि दि इकॉनॉमिस्ट हे साप्ताहिक माझ्या नित्य वाचनाचा भाग झालं. पाठोपाठ अटलांटिक, न्यू यॉर्कर यांनी माझा ताबा घेतला. त्या मागोमाग न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स आणि पॅरिस रिव्ह्यू ऑफ बुक मी आवडीने वाचू लागलो.
एशियाटिकमध्ये बसून हे सगळे पेपर चाळणं आणि ज्या विषयात रस आहे किंवा लिहायचं आहे त्या विषयावरचे लेख वाचून काढणं हे माझं दैनंदिन काम झालं. जवळ जवळ २००० सालापर्यंत माझ्या वाचनात वरील पेपर प्रामुख्याने असत. त्यानंतर मात्र या पेपरांत ज्यांचं लिखाण मी वाचत असे त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचू लागलो. बातमीदार, संपादक, अभ्यासक यांनी लिहिलेली नॉन फिक्शन पुस्तकं. २००० सालानंतर ही पुस्तकं थोड़ी महाग का होईना पण सहज उपलब्ध होऊ लागली. तोवर मीही जगभर भटकायला सुरुवात केली होती.
त्यामुळे परदेशात गेलं की पुस्तकं विकत आणायची सवय लागली होती. परदेशात पुस्तकाच्या चार दोन महिनेच जुन्या झालेल्या आवृत्याही रद्दीमोल भावाने मिळत. पेपर आणि पुस्तकं वाचनाचं स्वरूप नॉन फिक्शन. विषय वाट्टेल ते. डोळ्याला आणि डोक्याला एक सवय लागली. त्यातून एक से एक माणसं मिळाली. माझ्या बुद्धीला, पत्रकारितेला त्यांनी काहीच्या काही खाद्य पुरवलं.
रिशार्ड कापुश्चिन्स्की नावाचा पोलंडचा बातमीदार. जगात कुठेही अशांतता माजली, क्रांती झाली की हा बातमीदार तिकडे हजर. उत्सुकतेपोटी. जीव धोक्यात घालून. समोर घडणाऱ्या घटना आणि भेटणारी माणसं हे सारं पूर्वग्रह न ठेवता समजून घ्यायचं. भाषा परिचयाच्या नाहीत, चालीरीती परिचयाच्या नाहीत. तरीही तो बिनधास्त परिस्थितीला भिडत असे. कापुश्चिन्स्कीने बातम्या लिहिल्या, वार्तापत्रं लिहिली. तीही त्याच्या पोलिश भाषेत. पुढे त्याने लिहिलेला मजकूर पुस्तकरूपात आला आणि तो इंग्रजीत प्रसिद्ध झाला तेव्हा जग त्याला ओळखू लागलं. अंगोला, इथियोपिया, रशिया, भारत, इराण.. कापुश्चिन्सकी कुठे गेला नाही विचारा. पैशाची चणचण असे. पण त्याला फिकीर नव्हती. घटना घडत असताना हजर राहणं. माणसांना प्रत्यक्ष भेटणं, बोलणं याने तो झपाटलेला होता.
मेरी कॉल्विन तर कापुश्चिन्सकीचीही बाप निघाली. सीरिया, रशिया, इराक, लंका इत्यादी ठिकाणी फिरली. बॉंब पडत, तोफगोळे दणाणत, शेलिंग सुरू असे. ही बाई बिनधास्त तिथे जाऊन संकटात सापडलेल्या लोकांशी बोलत असे, त्यांची हकीकत लिहून काढत असे. बहुतेक वेळा ती जिथे जात असे त्या देशांना ती नको असे. पण तिने पर्वा केली नाही. भाषा येत नाही. संकट आलं तर मदत करायला कुणी नाही. समोरून सैनिक बंदूक रोखून उभे आहेत अशा परिस्थितीत तिने आयुष्यभर काम केलं. युद्धग्रस्त माणसांचं जगण तिने जगापुढे आणलं. तिचा एक डोळा शेलिंगमधे गेला होताच, शेवटी तीही सीरियातल्या बाँबस्फोटातच मरण पावली.
जॉन मिचेल आपली अस्मिता आणि पत्रकार असणं पेटीत कुलुपबंद करून घराबाहेर निघत असे. वाट फुटेल तिथे जात असे. कधी आठवड्याला दोन स्टोऱ्या मिळत, तर कधी सहा महिने भाकड जात, एकही स्टोरी हाताशी नसे. समाजात ज्यांची कोणी दखल घेत नाही अशा माणसांच्या बातम्या मिचेल करत असे. एखादा माणूस जगण्यासाठी नदीत पडलेल्या प्रेतांच्या अंगावरच्या वस्तू विकतो. स्वतःचं पोट जेमतेम भरतंय अशी बाई रस्त्यावरच्या असहाय्य दारुड्यांची काळजी घेते.. अशी माणसं मिचेलच्या लेखांमध्ये असत.
तत्वज्ञान हा विषय म्हणे वाचकांना अवघड वाटतो, त्यांना सवंग गोष्टी हव्या असतात. न्यू यॉर्करच्या विल्यम शॉन यांना तसं वाटत नव्हतं. वेद मेहता या तरुण भारतीय वार्ताहराला त्यांनी ऑक्सफर्डमध्ये पाठवलं आणि त्यावेळच्या जगातल्या टॉपच्या तत्वज्ञांशी बोलायला सांगितलं. शॉननी वेद मेहतांना सांगितलं, बिनधास्त जा, ते जे सांगतील ते निमूट ऐकून घे, प्रश्न विचार, इतर तत्वज्ञांना भेट, ऑक्सफर्डमध्ये रहा आणि लिही. वेद मेहता ते लिहीत गेले. जर्नालिझमचा एक वेगळा प्रकार आकाराला आला.
एकदा वॉटरगेटच्या इमारतीत घुसलेल्या चोरांना कोर्टात उभं करण्यात आलं होतं. चोर छान सूट वगैरे घालून आले होते. हे काय प्रकरण आहे ते बॉब वुडवर्ड या पत्रकाराला कळेना. काहीतरी लोच्या दिसतोय, असं म्हणत वुडवर्डनी त्या बातमीचा पाठपुरावा करायचा ठरवलं. त्यांच्या कार्यकारी संपादकाला बातमीचा कान होता. अगदी छोट्या छोट्या घटनांतच बातमी असते. अनंत छोट्या घटना जोडल्या की महाभारत घडतं याची जाण या दोघांनाही होती. कोर्टातल्या त्या घटनेचा महिनोन् महिने पाठपुरावा करून या वुडवर्डनी शेकडो छोट्या बातम्या लिहिल्या. त्यातूनच वॉटरगेट घडलं, एका राष्ट्राध्यक्षाला सत्ता सोडावी लागली. राजकीय शोध पत्रकारितेतला हा मानदंड मानला जातो. (या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्याच बातमीच्या पडसादांचा फोटा आहे.)
वॉटरगेट घडत असताना प्रेसिडेंट निक्सन यांनी वॉशिंग्टन प्रेस हा पेपर बंद पाडण्याचा प्रयत्न केला, त्यावर अनेक खटले गुदरले. सत्ताधारी पक्ष आणि सरकारने राळ उडवली. वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यू यॉर्क टाइम्स कम्युनिस्ट आहेत, अमेरिका या देशाचा नाश करायला निघाले आहेत, असा प्रचार झाला. पण पेपरच्या मालक प्रकाशक कॅथरीन ग्रॅहॅम डगमगल्या नाहीत. त्यांनी सगळी ताकद वुडवर्ड यांच्या मागे उभी केली. वॉशिंग्टन पोस्ट एकटं नव्हतं. न्यू यॉर्क टाइम्स एरवी त्यांचा प्रतिस्पर्धी. पण या लढ्यात तोही पोस्टच्या सोबत उभा राहिला.
अशी पत्रकारिता करणारे हे पत्रकार. ती कोणी महान माणसं नाहीत. त्यांनी केलेल्या बातमीदारीत त्यांचा पेपर, त्यांचे संपादक, त्यांचे सहकारी यांचा हात असे. सखोल, साधार, समाजाचं दर्शन घडवणाऱ्या, बेधडक बातम्या करणारा जर्नालिझम यांच्यासारख्या माणसांनी रुजवला. ही पत्रकारिता तिथे संस्थात्मक होत गेली, ती एक व्यवस्था झाली, ती एक शिस्त झाली, तो एक व्यवसाय झाला.
पुस्तकात भेटणारे बातमीदार पेपरात लिहीत होते कारण त्यांच्या मजकुराचं मोल संपादकांना कळत होतं. संपादकांनी लोकांना असा मजकूर वाचायची सवय लावली होती. संपादक मजकूर तयार करत आणि त्यातून लोकांची अभिरुची घडत असे. वाचकांचा सर्व्हे घेऊन त्यांना जे आवडतंय तेच छापण्याचा प्रकार संपादक करत नव्हते. या पुस्तकातले बातमीदार, त्यांचे संपादक, त्यांची वर्तमानपत्रं आणि नियतकालिकं बाजाराच्या वळणाने गेले नाहीत, तर बाजार त्यांच्या वळणाने गेला.
गार्डियन (१८२१) आणि इकॉनॉमिस्ट (१८४३) सुरू झाले, तेव्हा इंग्लंड फ्यूडल होता. जमीनदार आणि उच्चभ्रू वर्गाची मिरासदारी होती. तीच मंडळी सरकारात असत, तीच नोकरशाहीत असत, तीच पार्लमेंटमध्ये असत. चर्चचाही पगडा होता. गार्डियनचे जॉन टेलर त्या समाजाच्या ऊच्चभ्रू वर्गातले होते, व्यापारी आणि जमीनदारांचे मित्र होते. १८२१ साली गार्डियन ऊच्चभ्रू लोकांची बाजू घेत असे. पण २०२१ साली गार्डियनला दोनशे वर्षं झाली तोवर ब्रिटीश समाज बदलला होता. लोकशाही, उदार विचार, मानवी स्वातंत्र्य, पर्यावरण, शांतता इत्यादी विचार समाजाने स्वीकारले आणि त्याच विचारात गार्डियन विकसित झाला. हे विचार गार्डियन जन्माला आला तेव्हा अस्तित्वात नव्हते. प्रत्येक संपादक काळानुसार बदलत गेला आणि बदलत्या काळात स्थापित असलेली मूल्यं पेपरच्या धोरणात गुंफत गेला.
स्वातंत्र्य आणि लोकशाही ही पत्रकारितेची मूल्यं म्हणून प्रस्थापित झाली. १८४३ साली गार्डियन सुरू झाला, तेव्हा लोकशाही आणि स्वातंत्र्य ही मूल्यं समाजात प्रस्थापित झाली नव्हती. त्यामुळे साहजिकच ती पत्रकारितेचीही मूल्यं नव्हती. व्यापार, देशाचं हित, धर्माचं हित याच मूल्यांवर पेपर चालत होते. काळाच्या ओघात औद्योगिक क्रांती झाली, नवं तंत्रज्ञान आलं, व्यापाराने जागतिक रूप घेतलं, लोकशाही विकसित झाली, दोन महायुद्धं झाली. या खटाटोपात पत्रकारिता आपली मूल्यं तपासत गेली, घडवत गेली. ही मूल्य सहजासहजी घडली नाहीत. सरकार, सत्ताधारी समाजगट, धर्म, व्यापारी, उद्योगपती, गुन्हेगार इत्यादी लोकांनी पत्रकारिता दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांना तोंड देता देता ही मूल्यं तयार झाली.
युरोपात, दक्षिण अमेरिकेत, आफ्रिकेत, चीनमध्ये, रशियात स्थिती आणि परिस्थिती वेगळी होती, तिथली पत्रकारिताही वेगवेगळी घडत गेली. राजकीय विचारधारा, लोकशाही पद्धती, परंपरा कुठल्याही असोत; माणसाला विचाराचं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हवं की नको? खलास! आचार-विचार- अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हा समाजाचा आणि जर्नालिझमचाही पाया असायला हवा इथवर आपण आलोय. हा प्रवास ब्रिटन, अमेरिकेत वेगळ्या रीतीने झाला, जगात इतर ठिकाणी तो वेगळ्या पद्धतीने होतोय.
हे सारं आपल्या कानी असावं एवढाच या पुस्तकाचा उद्देश आहे.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.